जेजुरी गड गणपूजा

श्रीभगवान शंकर महादेव जगत्कल्याणासाठी मार्तंड भैरव अवतारामध्ये कैलासावरून भूतलावर अवतरले तो दिवस होता आषाढ शुद्ध प्रतिपदा यादिवशी देव गणांनी श्री मार्तंड भैरवाची भंडा-याने पूजा केली तेव्हापासून हा शुभ दिवस 'गणपूजा' या नावाने ओळखला जातो.

आजही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. कडेपठार देवता लिंग मंदिरामध्ये रात्री नित्य नेमाची पूजा झालेनंतर मानकरी देवावर भंडार वाहतात त्यापाठोपाठ सर्व भक्तमंडळी भंडार वाहतात अशा पद्धतीने स्वयंभू लिंगावर भांडाराच्या राशी उभ्या राहतात त्यानंतर देवाची आरती होऊन मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी छबिना निघतो तो रात्रभर दिवटीच्या प्रकाशात व सनईच्या मंजुळ स्वरामध्ये चालतो. वाघ्या मुरुळी तसेच इतर स्थानिक कलाकारांच्या दृष्टीने महत्वाचा दिवस असल्याने प्रत्येकजण आपल्या परीने देवापुढे आपली कला सादर करतात. छबिना मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर देवाचे अंगावरील भंडार भाविक भक्तांना प्रसाद म्हणून वाटला जातो.